Ad will apear here
Next
हृदयाशी संवाद साधणारा काव्यसंग्रह – हृदयसंगम
पुण्यातील अथर्व ढगे हा नुकताच शाळेतून महाविद्यालयात पाऊल ठेवलेला मुलगा विविध विषयांवर अगदी सहजपणे कविता करतो. अनेकविध विषयांवर त्याने लिहिलेल्या ७८ कविता ‘हृदयसंगम’ नावाच्या कवितासंग्रहाच्या माध्यमातून बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केल्या आहेत. अथर्वच्या या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाबद्दल...
................
‘लेखणी, कागद, मन आणि कविता यांचा संगम म्हणजेच हृदयसंगम,’ अशा नेमक्या आणि मोजक्या शब्दांत अथर्व ढगेने त्याच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाचे वर्णन केले आहे. त्याला काय लिहायचे आहे किंवा त्याने काय लिहिले आहे, याबाबत त्याचा दृष्टिकोन स्पष्ट असल्याचे यावरून जाणवते. ‘नेमक्या, अर्थपूर्ण आणि बऱ्याचदा यमक साधलेल्या शब्दांचा योग्य साचा म्हणजे कविता असते,’ असे अथर्वला वाटते. ‘हृदयसंगम’ या त्याच्या काव्यसंग्रहातील कविता वाचताना, खरोखर इतक्या लहान मुलाने या कविता लिहिल्या आहेत, असे वाटत नाही. शालेय जीवनापासून वाचनाची आणि मग हळूहळू लेखनाचीही आवड निर्माण झालेला अथर्व शाळेत असतानाच कविता लिहायला लागला होता. एकूण ७८ कविता असलेल्या त्याच्या ‘हृदयसंगम’ या काव्यसंग्रहात लहानपणीच्या, शाळेतील आठवणींच्या, निसर्गावरील प्रेमाच्या, तळमळीच्या, प्रेमाच्या कविता सापडतात. तसेच नुकत्याच शाळेतून महाविद्यालयात पाऊल ठेवलेल्या एखाद्या तरुणाच्या मनातील भावना, त्याच्या इच्छा, आकांक्षा यांनाही अथर्वने आपल्या कवितांमधून वाट मोकळी करून दिली आहे. 

त्याच्या या काव्यसंग्रहातील ‘शाळा’, ‘वृक्षांविना’, ‘का?’, ‘वारा’, ‘एक रोपटे’, ‘मित्र’, ‘नववर्ष’, ‘पक्षी’ अशा काही कविता त्याच्या अवखळ शालेय जीवनाची ओळख करून देतात. ‘रात्र प्रेमाची’, ‘प्रेम’, ‘तुझा डीपी’, ‘प्रेमफुले’, ‘तुझे नि माझे’, ‘तू गेलीस’, ‘प्रेमसागर’, ‘तुझ्यात हरवत जावे’ अशा काही प्रेमकवितांमधून, अल्लड बालमन आता अवखळ तारुण्यात डोकावू पाहत आहे, असे जाणवते. अथर्वची प्रत्येक कविता वाचनीय आहेच, शिवाय त्याच्या वयाचा विचार करता ती अचंबित करणारीही आहे. पुस्तकातील सर्वच कविता अगदी बोलक्या आहेत. त्या आपल्याशी संवाद साधत आहेत, असा भास होत राहतो.

त्याच्या वयाला साजेसे असे विषय त्याने हाताळले आहेत. लय, छंद, ताल जपण्याची एक असोशी त्याच्या कवितांमध्ये दिसते. कवितेतील वृत्तांचा, मात्रांचा अभ्यास केला, तर ही लय अधिकाधिक सुंदर होत जाईल, असे वाटते. अनेक कविता साध्या, सहज, सोप्या शब्दांना एकत्र बांधून आलेल्या दिसतात. 

शाळा म्हणजे काय असते, कधी कळलीच नाही
शिक्षा रोजचीच, शाबासकी कधी मिळालीच नाही
मॅडम वर्गात आल्या, की आम्ही गप्प बसायचो 
वरती वरती गंभीर होऊन मनात खूप हसायचो..

अथर्व ढगेया अशा अगदी सहज-सोप्या ओळी आणि त्यांचा अर्थही अगदी तसाच साधा, सरळ. ही पद्धत लक्ष वेधून घेते. तो वाचत असलेल्या कवितांचा किंवा इतर साहित्याचाही त्याच्यावर प्रभाव असल्याचे अनेक कवितांमधून जाणवते. बऱ्याचदा कानांवर पडणाऱ्या कविताचे अनुकरण केल्याचाही भास होतो; मात्र यावरून त्याने अनेक पूर्वसुरींच्या कवितांचा अभ्यास केला आहे, हेदेखील लक्षात येते. 

तू नसताना तुझी आठवण 
मनात माझ्या घुटमळते,
तू असताना नजरेसमोरी
मलाच माझे मीपण कळते..

ही कविता त्यापैकीच एक म्हणावी लागेल. आजच्या संगणकाच्या युगात अनेक मोहजालांपासून दूर राहून कवितेच्या विश्वात रमणारी अशी मुले विरळच असावीत.
आपल्या कवितांचा श्रीगणेशा वाचनातून झाला, असा उल्लेख अथर्वने मनोगतात केला आहे. ‘वाचन आपल्या जीवनाच्या अनेकविध पैलूंचे दर्शन आपल्याला घडवते.
अगदी वृत्तपत्रांपासून ते आजकालच्या ई-बुकपर्यंत आपण खूप काही वाचू शकतो,’ असे अथर्व म्हणतो. कुसुमाग्रज, पाडगावकर, करंदीकर यांसारख्या दिग्गजांपासून ते आजचे तरुण कवी संदीप खरेंपर्यंत अनेकांचे साहित्य/कविता अथर्वने वाचल्या आहेत. या सगळ्यांचा प्रभाव आपल्या लेखनावर असल्याचेही तो सांगतो. ‘कविता सुचण्यात आणि रुचण्यात भोवतालची परिस्थिती कारणीभूत असते,’ असे अथर्वला वाटते. कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना दिली आहे. अथर्व ढगे याच्या वयाच्या प्रत्येकाने आणि इतरही सर्वांनी आवर्जून वाचावा असाच हा कवितासंग्रह आहे.  

पुस्तक : हृदयसंगम (कवितासंग्रह) 
कवी : अथर्व ढगे, गणेश कॉलनी, कोथरूड, पुणे 
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे 
पृष्ठे : ८० 
मूल्य : १७५ रुपये
ई-बुक मूल्य : १०० रुपये

(हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZHRBW
Similar Posts
हृदयसंगम : अथर्व ढगे - कविता अभिवाचन (व्हिडिओ) लेखणी, कागद, मन आणि कविता यांचा संगम म्हणजेच हृदयसंगम असं म्हणणाऱ्या अथर्व ढगे या तरुण कवीचा हृदयसंगम हा पहिलाच कवितासंग्रह. बुकगंगा पब्लिकेशन्सने हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. त्यातील काही कविता सादर करतोय स्वतः अथर्व ढगे.
हृदयसंगम - अथर्व ढगे काही कवितां‘बद्दल’ बोलण्यापेक्षा त्या ‘कवितांशीच’ बोलणं जास्त महत्त्वाचं असतं. या पुस्तकात अशा काही कविता आहेत, ज्या तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील आणि कवितांमधून तुमच्याशी बोलण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. मागील दोन वर्षात म्हणजेच ९ वी-१० वी च्या वयात मला अनेक थोर कवींकडून मार्गदर्शन मिळालं आहे
अमेरिकेतलं बाळंतपण सध्याच्या युगात जग लहान झालंय. विविध क्षेत्रांतील मोठमोठ्या कंपन्यांच्या नोकरीसाठी बहुसंख्य लोक परदेशी प्रयाण करत आहेत. कालांतराने ते कुटुंबासहित तिकडेच राहतात. पुढे परदेशस्थ झालेल्या लेकी-सुनांच्या बाळंतपणासाठी आईलाही तिकडे जावे लागते. या अशा सगळ्या थोड्या किचकट, पण सुखावणाऱ्या अनुभवातून ‘माधुरी गुर्जर’
आरती देवगांवकर यांच्या कवितासंग्रहाचे १४ डिसेंबरला प्रकाशन पुणे : कवयित्री आरती देवगांवकर यांचा ‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ हा कवितासंग्रह १४ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यात प्रकाशित होत आहे. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे हा कवितासंग्रह प्रकाशित होत असून, सुप्रसिद्ध अभिनेते, कवी, गीतकार जितेंद्र जोशी यांच्या हस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language